काँग्रेसच्या ८४व्या महाअधिवेशनात समारोपाच्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हत्या प्रकरणातील आरोपी अशा कठोर शब्दांत टीका केली होती. ही टीका भाजपाला चांगलीच झोंबल्याने त्यांनी यावरुन राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी हे स्वतः नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील आरोपी असून सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. तरी देखील ते दुसऱ्यांवर आरोप करून आपल्या कार्यकर्त्यांसाठी खोटी प्रेरणा मोहिम राबवत असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.


काँग्रेसच्या महाअधिवेशनात अमित शहांवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले होते की, भाजपाने हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवले आहे. यावर उत्तर देताना सीतारामण म्हणाल्या, कोर्टाने आमच्या अध्यक्षांना क्लीनचिट दिली आहे. उलट, राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील आरोपी असून सध्या जामीनावर बाहेर आहेत.

ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले. ते आज स्वतःची तुलना पांडवांशी करीत आहेत. राहुल यांनी आपल्या भाषणात भाजपा आणि संघाची तुलना सत्तेसाठी भांडणाऱ्या कौरवांशी केली होती आणि काँग्रेस सत्याची कास धरणारे पांडव असल्याचे म्हटले होते. महाभारतातील या प्रसंगावरून हे वक्तव्य म्हणजे पराजित झालेल्या व्यक्तीचे स्पष्टीकरण आहे, अशा शब्दांत सीतारामण यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्याचाही उल्लेख केला होता. यावर सीतारामण म्हणाल्या, राहुल गांधी असे यासाठी म्हणत आहेत कारण स्वातंत्र्याचे सर्व श्रेय त्यांना आपल्या कुटुंबालाच द्यायचे आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने पुन्हा एकदा हिंदू धर्माचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या पुजाऱ्यांचे उदाहरणही आपल्या भाषणात दिले होते. मात्र, आपण आजवर असे पुजारी पाहिले नसल्याचे सीतारामण माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.