मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अशात आता मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या समवेत पाच पक्षांचे नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये असणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते उद्या संध्याकाळी पाच वाजता भेटणार आहेत. कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे.

सीताराम येचुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींसोबत होणारी ही भेट कृषी कायद्यांसंदर्भात असणार आहे. गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांनी भारत बंदचीही हाक दिली होती. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या विचारांचे पक्ष, शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. आता उद्या राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंबंधीची चर्चा केली जाणार आहे.

मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी मागील १३ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.पंजाब आणि हरयाणा या राज्यातून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलंही सहभागी झाली आहेत. शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांसोबत आत्तापर्यंत दोन वेळा चर्चा झाली आहे. चर्चेची तिसरी फेरी उद्या दुपारी पार पडणार आहे. मात्र आधीच्या चर्चांमधून काहीही तोडगा निघालेला नाही. आता नेमकं काय होणार हे कायदे मागे घेतले जाणार की शेतकरी सरकारचं ऐकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.