प्रजासत्ताक दिनापासून देशात शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याचं सरकारला ठणकावत आंदोलन सुरूच ठेवलं असून, आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर देशातील कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेविषयी ट्विट केले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही यासंदर्भात भूमिका मांडली होती. त्यानंतर अचानक भारतीय टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी मागू लागले आहेत.

“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असं ट्विट तेंडुलकरने म्हटलं होतं. त्याच्या या ट्विटवरून नाराजी उमटताना दिसली. सोशल मीडियावरून अनेकांनी सचिनच्या भूमिकेवर टीका केली.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन: भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही – सचिन तेंडुलकर

शारापोवाची माफी मागण्याचं कारण काय?

सचिन तेंडुलकरवर नेटकऱ्यांकडून टीका होत असताना अचानक टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी भारतीय मागू लागले आहेत. शारापोवाची माफी लोक का मागत आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यामागे कारण आहे शारापोवाची २०१५ मधील मुलाखत आणि त्यानंतर तिच्यावर झालेली टीका. या मुलाखतीत शारापोवाने सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून तिच्यावर बरीच टीका झाली होती.

आणखी वाचा- “एका ट्विटमुळे तुमच्या ऐक्याला बाधा पोहचत असेल तर तुम्हाला…”; सेलिब्रिटींना लगावला टोला

तू बरोबर होतीस मारिया, आम्ही माफी मागतो…

सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर बुधवारी मारिया शारोपोवाच्या फेसबुक पेजवर भारतीय नागरिक माफी मागत आहेत. “जेव्हा तू म्हणाली होतीस की, तू सचिन तेंडुलकरला ओळखत नाहीस, तेव्हा आम्ही तुझ्यावर टीका करण्यासाठी आलो होतो. पण आता नियतीनेच हे सिद्ध केलं आहे की एखाद्याला त्याच्याविषयी माहिती नसावी. तू बरोबर होतीस, मारिया. आम्ही माफी मागतो,” असं एकाने म्हटलं आहे.

“भूतकाळात जसं वागलो त्याबद्दलआम्ही मनापासून माफी मागतो. तू योग्य होतीस. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आम्हाला माहिती नाही, सचिन कोण आहे?,” असं एका नेटकऱ्यांनं म्हटलं आहे. तर “शारापोवा, आम्हाला माफ कर आम्ही एक चुक केली होती,” असंही मारियाच्या पोस्टखाली एकानं म्हटलं आहे.

आणखी वाचा- Farmer Protest : रिहानाच्या हातात पाकिस्तानी झेंडा? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

“२०१४मध्ये केलेल्या ट्रोलिंगबद्दल माफ कर. सचिन तेंडुलकर कोण आहे? हे तुझं म्हणणं शंभर टक्के योग्य होतं. तो कणा नसलेला आणि भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाही,” असं एकाने म्हटलं आहे.