शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टिकरी बॉर्डरवर येण्यासाठी आज हरयाणामधील हांसी येथून शेतकरी आंदोलकांनी आज पदयात्रा सुरु केली आहे. या पदयात्रेला शहीद भगत सिंग यांची भाची गुरजीत कौर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहचलेल्या गुरजीत कौर यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारला विरोध करणाऱ्यांना सरकारकडूनच देशद्रोही म्हटल्यास शहीदांच्या कुटुंबियांना वेदना होतात, असं गुरजीत म्हणाल्या आहेत. विरोधी आवाज दाबण्याची संस्कृती आणि भ्रष्टाचाराचं बीज काँग्रेसनेच देशामध्ये पेरलं. मात्र सध्याचं सरकार लोकशाही माध्यमातून विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सर्व मर्यादांचे उल्लंघन करत आहे, अशा शब्दांमध्ये गुरजीत कौर यांनी सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधला.

हांसीमध्ये शेकडो शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यी या पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी त्यामध्ये सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा २३ मार्च रोजी म्हणजेच थोर  क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्या शहीद दिनाच्या दिवशीच टिकरी बॉर्डवर पोहचणार आहे. ही पदयात्रा पहिल्यांदा सोरखी गावामध्ये थांबणार असून तेथील शेतकरीही या पदयात्रेत सहभागी होणार आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

देशातील सध्याच्या परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना गुरजीत कौर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे लोकं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शांत झाले कारण त्यांना वाटलेलं की त्यांनी त्यांच काम पूर्ण केलं असून जे लोकं देशाचा कारभार पाहण्यासाठी सत्तेत येणार आहेत ते इमानदार असतील. मात्र तसं झालं नाही सत्ताधारी इमानदार निघाले नाहीत देश चुकीच्या व्यक्तींच्या हाती गेला आणि दिवसोंदिवस भ्रष्टाचार वाढला. कोणत्याच सरकारने जनतेचा विचार केला नाही. केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष स्पर्धा करताना दिसतात, असा टोला गुरजीत कौर यांनी लगावला.

शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना गुरजीत कौर यांनी २३ मार्चनंतर शेतकरी आंदोलन आणखीन जोमाने पुढे नेलं जाईल अशी माहिती दिली. २६ मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदचा परिणाम पहायला मिळेल असंही गुरजीत कौर म्हणाल्या. आता लोकांना सध्याच्या सरकारचा खोटारडेपणा कळू लागला आहे. हळूहळू लोकांचा भाजपावरील विश्वास उडत चालला आहे, अशी टीकाही गुरजीत कौर यांनी केली.