नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी आज राजधानीत घुसणार असून ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान तिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत.

आठवडय़ाभरातील चर्चेच्या पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होईल. या ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे काढले जातील. त्यानिमित्ताने गेले दोन महिने दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील, अशी माहिती स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे.

Viral Video : नाद खुळा… शेतकऱ्याची ट्रॅक्टर व्हीली पाहून थक्क व्हाल

संसदेवर १ फेब्रुवारीला मोर्चा
नवे शेती कायदे रद्द करावेत व किमान आधारभूत मूल्याला कायद्याची हमी द्यावी यासाठी शेतकरी आंदोलन करत असून १ फेब्रुवारी रोजी संसदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य व क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शनपाल यांनी सोमवारी दिली. शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यात झालेल्या चच्रेच्या ११ फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. शुक्रवारी २९ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.