१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये ‘फास्टॅग’द्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारनं १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणं अनिवार्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावं लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंडस्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.
How to buy Fastag दरम्यान, ‘फास्टॅग’ अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्यासंबंधिचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने ‘फास्टॅग’ खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.
टोलनाक्यावर मोफत ‘फास्टॅग’
१ डिसेंबरपर्यंत ‘फास्टॅग’ मोफत देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. सध्या केवळ टोलनाक्यांवर हे ‘फास्टॅग’ मोफत देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे बँका आणि अन्य संस्थांकडून ‘फास्टॅग’ बसवणाऱ्यांकडून शुल्क आकारलं जाणार आहे.
४१२ टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’
राष्ट्रीय प्राधिकरणाचे देशात एकूण ५३७ टोलनाके आहेत. यापैकी ४१२ टोल नाक्यांवर सर्व लेनवर ‘फास्टॅग’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्यावसायिक वाहनांच्या टॅगसोबत जीएसटीही कापला जाणार असून त्यामुळे वेळही वाचणार आहे.
‘फास्टॅग’साठी आवश्यक कागदपत्र
वाहनाचं नोंदणीचं पत्र
वाहनाच्या मालकाचा फोटो
केव्हायसीसाठी डॉक्युमेंट्स, वास्तव्याचा दाखला
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 10:58 am