मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामधील एका व्यक्ती स्वत:च्या मुलाला परीक्षा केंद्रावर पोहचवण्यासाठी चक्क ८५ किमी सायकल चावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मुलाला १० वीची परीक्षा देता यावी म्हणून वडिलांनी केलेला हा खटाटोप यशस्वी ठरला असून परीक्षेला सुरुवात होण्याच्या १५ मिनिटं आहे हे दोघे केंद्रावर पोहचले. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनेही दिलं आहे.

मध्य प्रदेश सरकारने दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या मुलांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ‘रुक जाना नाही अभियान’ हाती घेतलं आहे. या अभियानाअंतर्गत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी पुन्हा याच वर्षी परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. मंगळावारी याच अभियानाअंतर्गत गणिताचा पेपर घेण्यात आला. धारमधील मनावर येथे राहणाऱ्या शोभाराम यांचा मुलगा अशीष हा दहावीमध्ये तीन विषयांमध्ये नापास झाल्याने तो तीन पेपर देणार होता. मात्र परीक्षेचे केंद्र त्याच्या राहत्या घरापासून ८५ किमी दूर असल्याचे शोभारामच्या लक्षात आले. करोनामुळे बससेवा बंद असल्याने परीक्षा केंद्रावर पोहचायचं कसं असा प्रश्न सर्वांसमोर होता. अखेर शोभारामनेच मुलाला सायकलवर परीक्षा केंद्रापर्यंत पोहचवण्याचा निर्णय़ घेतला. शोभाराम पेपर सुरु होण्याच्या बरोबर १५ मिनिटं आधी मुलाला घेऊन परीक्षा केंद्रावर हजर झाले. बुधावारी आणि गुरुवारी अन्य दोन पेपर दिल्यानंतरच हे दोघे परत आपल्या घरी गेले. धारमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने या दोघांनी तीन दिवसाच्या जेवणाची सोय होईल इतकं अन्न बरोबर आणलं होतं.

मजूर असणाऱ्या शोभाराम यांनी, “मी स्वत: मजूर आहे मात्र माझ्या मुलावर ही वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. मी मजुरी करतो मात्र मुलाला अधिकारी बनलेलं पाहण्याचं माझं स्वप्न आहे. हे स्वप्न मी कोणतीही किंमत मोजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. माझ्या मुलाचे आणि त्याच्या कुटुंबाचे भविष्य अधिक समाधानकारक असावे यासाठी मी खटपट करत आहे,” असं सांगितलं.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत असल्याचे शोभाराम यांनी सांगितलं. गावात शिक्षकच उपलब्ध नसल्याने मुलाला अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळेच मुलगा तीन विषयांमध्ये नापास झाला, असं शोभाराम सांगतात. “मी स्वत: अशिक्षित असल्याने मुलाला मदत करु शकतो नाही. नापास झालेल्यांना सरकारने पुन्हा एक संधी दिली आहे. ही संधी माझ्या मुलाला गमावायची नाहीय,” असं शोभाराम म्हणाले.  तर आशीषने तीन विषयांमध्ये नापास झाल्याने आपल्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागत असल्याचे सांगितले. भविष्यात आपल्याला कलेक्टर व्हायचे असल्याचेही आशीष सांगतो.

शोभाराम आणि आशीषच्या संघर्षाची बातमी प्रसारमाध्यमांकडून समजल्यानंतर धारचे जिल्हाधिकारी अलोक सिंह यांनी शोभाराम यांनी शाळेतील शिक्षकांना सांगितलं असतं तर त्यांच्या मदतीने आशीषची येथे येण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात जिल्हा प्रश्नासने प्रयत्न केले असते असं सांगितलं. मात्र यापुढे अशाप्रकारे कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा पालकांना त्रास होणार नाही यासाठी विशेष खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाईल असंही सिंह यांनी स्पष्ट केलं. सिंह यांनी शोभाराम यांचे कौतुक करत त्यांच्याकडून आपल्या सर्वांनाच प्रेरणा घेता येईल असं मत व्यक्त केलं.