करोना लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली होती. मात्र, आता सर्वकाही रुळावर येत असल्याने यांपैकी बहुतेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा विचारही करीत आहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचाही विचार करीत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये काही विभागांनी कर्मचाऱ्यांचे कमी केले पगार पूर्ववत केले आहेत. त्याचबरोबर कोविड लॉकडाउनच्या काळात चांगल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्सकडून परफॉर्मन्स बोनसही देण्यात येणार आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे. इंधनापासून टेलिकॉम क्षेत्रात विविध नोकऱ्या उपलब्ध करुन देणाऱ्या रिलायन्स कंपनीने पुढील वर्षाच्या पगारामध्ये ३० टक्के अॅडव्हान्स देण्याचाही विचार करीत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी करोनाच्या काळात काम केलं अशा लाखो कर्मचाऱ्यांना सद्भावना म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, गेल्या तीन आठवडयांपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि माईंडट्री यांसारख्या अनेक टॉपच्या आयटी कंपन्यांनी नवी पगारवाढ जाहीर केली आहे. तसेच सणांच्या काळात बोनसही देणार असल्याचं म्हटलं आहे. अनेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा कंपन्याही पगार कपात मागे घेण्याचा विचार करीत आहेत. करोना लॉकडाउनचा या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला होता. या काळात या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या तर अनेकांना मोठ्या पागार कपातीला सामोरं जावं लागलं होतं.

पगारवाढ आणि बोनसही मिळणार

काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ आणि बोनसचाही विचार करीत आहेत. फार्मा, कॉन्झुमर फूड आणि टेक्नॉलॉजी सारख्या ज्या क्षेत्रांनी करोनाच्या काळात चांगली कामगिरी केली. त्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनस देण्याच्या विचारात आहेत.