पॅरिसमधील आत्मघाती हल्ल्यात वापरण्यात आलेले अंगरखे हे अत्यंत कुशल कारागिराने बनवलेले असावेत व तो युरोपातच कुठेतरी पळाला असावा असे मत गुप्तचर व सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सात हल्लेखोरांनी सारखेच अंगरखे आत्मघाती हल्ल्यासाठी वापरले होते . लंडनमध्ये २००५ मध्ये जे हल्ले झाले होते त्यात स्फोटके पाठीवरील बॅकसॅकमध्ये ठेवलेली होती ती यावेळी अंगरख्यावर बाळगण्यात आली होती. युरोपातील युद्धतंत्रात आयसिसने बदल केल्याचेच हे लक्षण आहे. आताचे तंत्र हे मध्यपूर्वेत वापरले तसेच आहे. आत्मघाती हल्ल्यांसाठी अंगरखे तयार करण्यासाठी स्फोटकविषयक तज्ज्ञांचीच गरज आहे, हमखास स्फोट होईल व तो पुरेशी हानी करणारा असेल याची काळजी घेण्यात आली होती व अशी स्फोटके तयार करणे हे एखाद्या अनुभवी स्फोट तज्ज्ञाचेच काम आहे, असे माजी गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले. ही स्फोटके अंगावर बाळगताना हल्लेखोरांना हालचाली करणे जड जाऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. ती अपघाताने उडणार नाहीत याचीही खबरदारी यात घेतली होती.