‘‘फजरचा पहिला नमाज झाल्यावर सकाळी नऊ वाजता हज यात्रेकरू मीना येथे सैतानाला दगड मारण्यासाठी जाऊ लागले. पण ५० अंश सेल्सियस तापमान असल्याने वाटेतच कित्येकजण बेशुद्ध पडले होते. सकाळीच चेंगराचेंगरी सुरू झाली आणि त्यावेळीही दगडांचा नेम चुकल्यानेदेखील अनेक यात्रेकरू जखमी झाले,’’ अशी माहिती महाराष्ट्राच्या हज समितीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी ‘इंडियन एक्स्प्रेसला’ दिली.

आटोक्याबाहेर जाणारी गर्दी आणि चेंगराचेंगरीची खबर मिळताच महाराष्ट्राच्या हज समितीने आपल्या जथ्यातील वृद्धांना तेथे जाण्यापासून रोखले. या यात्रेत सर्वाधिक म्हणजे २३ हजार १०६ यात्रेकरू उत्तर प्रदेशातून गेले आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगमधून १० हजार ५९० तर महाराष्ट्रातून नऊ हजार ४०० भाविक गेले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधून सहा हजार भाविक गेले आहेत.
आंध्र आणि तेलंगणच्या हज समितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, चेंगराचेंगरी झाली तेव्हा आफ्रिकी आणि इराणी भाविकांची संख्या सर्वाधिक होती. विशेष म्हणजे सौदी युवराजांनी आफ्रिकी भाविकांमुळेच चेंगराचेंगरी ओढवल्याचा आरोप केला आहे. यात्रेकरूंनी नियमांचे यथायोग्य पालन न केल्यामुळे ही दुर्घटना ओढवल्याचे मत सौदीच्या आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
चेंगराचेंगरीनंतर भारतातून आलेल्या भाविकांनी आपल्या घरी दूरध्वनी करण्याची धडपड सुरू केली. दोन भारतीय या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले, तर दोनजण जखमी झाले आहेत. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या हैदराबादच्या जानबीबी मजिद (वय ६०) यांचा मुलगा अब्दुल याने सांगितले की, जानबीबी आणि अन्य तीन महिला हज यात्रेला गेल्या होत्या. अन्य तिघी सुखरूप असून जानबीबी मात्र चेंगराचेंगरीत सापडल्याने मृत्युमुखी पडल्या.