देशातील एटीएममधून कमी होत असलेल्या २ हजार रूपयांच्या नोटांबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. २ हजार रूपयांचं सर्क्युलेशन रोखण्याचे आदेश सरकानं बँकांना दिले नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. “माझ्या माहितीप्रमाणे बँकांना असे कोणतेही आदेश देण्यात आले नाही,” असं त्या म्हणाल्या. देशभरातील एटीएममधूल २ हजार रूपयांच्या नोटा हटवण्यात येणार असल्याच्या चर्चांदरम्यान अर्थमंत्र्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. गुवाहाटी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या.
एका अहवालात देशातील २ लाख ४० हजार एटीएममधून २ हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी ‘इंडियन बँके”ने देशभरातील आपल्या ३ हजार एटीएममधून २ हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहक केवळ २ हजार रूपयांचे सुटे करून घेण्यासाठी बँकांमध्ये येत असतात. त्यामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, असं बँकेककडून सांगण्यात आलं होतं.
नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेने २ हजार रूपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. त्यानंतर बेहिशोबी रक्कम जमा करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात २ हजार रूपयांचा साठा केला होता. तसंच गेल्या वर्षी संसदेत उत्तर देताना जप्त करण्यात आलेल्या बेहिशोबी रकमेपैकी ४३ टक्के या २ हजार रूपयांच्या नोटा होत्या असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं. तर काही दिवसांपूर्वी एका आरटीआयला उत्तर देताना आरबीआयनं सांगितलं होतं की २०१६-१७ या आर्थिक वर्षात २ हजार रूपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. तर २०१७-१८ मध्ये यात घट झाली आणि ११.१५ कोटी नोटा छापण्यात आल्या. २०१८-१९ मध्ये यात आणखी घट झाली आणि ४.६६ कोटी नोटा छापण्यात आल्या. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने सध्या आपण २ हजार रूपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचंही म्हटलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2020 7:32 am