दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद रोखण्यात यश आल्याचा कांगावा करून ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) ‘करडय़ा यादी’तून सुटका करून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असफल ठरण्याचे संकेत आहेत. पाकिस्तानला ‘करडय़ा यादी’तच कायम ठेवावे, अशी शिफारस ‘एफएटीएफ’ च्या उपसमितीने केली असून, त्याबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी घेण्यात येणार आहे.

‘एफएटीएफ’च्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आढावा गटाच्या (आयसीआरजी) पॅरिस येथे सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आयसीआरजी’ या ‘एफएटीएफ’च्या उपसमितीने पाकिस्ताला करडय़ा यादीतच कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. मात्र, पाकिस्तानबाबतच्या प्रश्नांवर ‘एफएटीएफ’ शुक्रवारी चर्चा करणार असून त्यावेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याला पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने ११ वर्षांची शिक्षा ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर ‘एफएटीएफ’ची बैठक होत आहे. पाकिस्तानला करडय़ा यादीतून बाहेर पडून पांढऱ्या यादीत समावेशासाठी ३९ पैकी किमान १२ मतांची आवश्यकता आहे. काळ्या यादीतील समावेश टाळण्यासाठी किमान तीन देशांच्या पाठिंब्याची पाकिस्तानला गरज आहे.