हज यात्रेच्या आधीच क्रेन कोसळून १०७ जण ठार झाल्याच्या दुर्घटनेचे कारण शोधून काढण्याचा निर्धार सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी केला आहे. या दुर्घटनेत भारतातील दोन महिलाही मरण पावल्या आहेत. गेल्या वर्षी हज यात्रेला २० लाख मुस्लीम आले होते. शुक्रवारच्या दुर्घटनेनंतरही यावेळची हाज यात्रा ठरल्याप्रमाणे होणार असून लोकांनी घाबरण्याचे कारण नाही असे सौदी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लाखो मुस्लीम लोक मक्केत आले असून शुक्रवारी लाल व पांढऱ्या रंगाची क्रेन वादळाने कोसळली होती.
सर्व चौकशी करून कारण उघड केले जाईल असे सलमान यांनी सांगितले. सध्या या मशिदीचा काही भाग बंद करण्यात आला असून ढिगारा उचलण्याचे काम चालू आहे. या दुर्घटनेत दोनशे लोक जखमी झाले आहेत. दरम्यान यात्रेकरूंनी काही छायाचित्रे काढली आहेत. मोरोक्कन यात्रेकरू ओम सलमा यांनी सांगितले की, आमचे नातेवाईक फोन करीत असून ते सतत चालू आहेत. जखमींमध्ये मलेशियन, ईजिप्शियन, इराणी, तुर्की, अफगाणी व पाकिस्तानी लोकांचा समावेश आहे. राजे सलमान यांनी मृतांबाबत शोकसंवेदना व्यक्त केली असून त्यांनी स्थानिक रुग्णालयाला भेट देऊन विचारपूस केली. हाज यात्रा २१ सप्टेंबरला सुरू होत असून ती नियोजनाप्रमाणे होणार आहे. दुर्घटनाग्रस्त भाग दुरुस्त केला जाईल. चौकशी समिती तातडीने दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेणार आहे.