भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले संबंध गेल्या ६ दशकांहून जास्त काळ तणावपूर्ण आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमारेषेवर कमालीची सुरक्षा असणार हे तर अपेक्षितच आहे. पण ती किती कमालीची आणि चोख असू शकते, याचं प्रत्यंतर नुकतंच एका घटनेतून समोर आलं आहे. ‘परींदा भी पर नहीं मार सकता’ हा संवाद आपण अनेकदा सिनेमांमधून ऐकला असेलच. पण या घटनेमध्ये तो प्रत्यक्ष अनुभवायला देखील मिळाला! कारण सीमारेषेवर उडणाऱ्या एका कबुतराची पंजाब पोलिसांनी ‘धरपकड’ करून चक्क गुन्हा दाखल केला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. या कबुतराच्या पायाशी एक चिठ्ठी बांधली असल्याचं देखील पोलिसांना आढळून आलं असून त्यावर एक नंबर लिहिला असल्याची माहिती समोर आली आहे!

नेमकं झालं काय?

तर त्याचं झालं असं, की भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोरनवाला इथल्या सीमारेषेजवळ हा प्रकार घडला आहे. सीमारेषेवरच्या पोस्टवर कॉन्स्टेबल नीरज कुमार ड्युटीवर होते. ही पोस्ट पाकिस्तानच्या सीमारेषेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. १७ एप्रिल रोजी नीरज कुमार कॅम्प पोस्टवर ड्युटीवर असताना अचानक एक काळ्या-पांढऱ्या रंगाचं कबुतर नीरज कुमार यांच्या खांद्यावर येऊन बसलं!

स्टँडर्ड चोर! Samsung Galaxy S10 Plus आवडला नाही म्हणून केला परत; मालकाला म्हणाला, “मला वाटलं…

कबुतराच्या पायाशी होती चिठ्ठी!

आपण भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ड्युटीवर आहोत, याचं पूर्ण भान असणारे नीरज कुमार यांनी प्रसंगावधान राखून लागलीच त्या कबुतराला पकडलं. पोस्ट कमांडर ओमपाल सिंग यांना नीरज कुमार यांनी लागलीच माहिती दिली. ओमपाल सिंग यांनी कबुतराची काळजीपूर्वक पाहणी केली! नीट निरीक्षण करून पाहिल्यानंतर ओमपाल सिंग यांना कबुतराच्या पायाशी काहीतरी बांधल्याचं दिसलं.

चिठ्ठीमध्ये सापडला नंबर!

ओमपाल सिंग यांनी पायाला चिकटवलेला कागद मोकळा करून पाहिल्यानंतर त्यात एक नंबर लिहिलेला त्यांना दिसला. 03024103346 हा नंबर एखाद्या लॅंडलाईनचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा नंबर सापडल्यानंतर पंजाब पोलिसांनी या कबुतराविरुद्ध अमृतसरच्या काहागड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारचं एक कबुतर जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात सापडलं होतं. या कबुतराला पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिलं असून तो कोडवर्डमधला एक संदेश घेऊन आला होता, असं प्रशासनाकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं.