सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या टूलकीट प्रकऱणावरुन आता काँग्रेसने भाजपा नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. भाजपाअध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजपाचे सरचिटणीस बी.एल.संतोष आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

राजस्थान काँग्रेसचे सचिव जसवंत गुर्जर यांनी जयपूरमधल्या बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये ही एफआय़आर दाखल केली आहे. त्यांनी भाजपावर खोटेपणा, कपट आणि ढोंगीपणाचं राजकारण असल्याचा आरोप केला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपाने एक टूलकीट प्रसिद्ध केलं. भाजपाने असा दावा केला होता की करोना परिस्थितीच्या संदर्भात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन कऱण्यासाठी काँग्रेसने हे टूलकीट तयार केले आहे.

जे.पी.नड्डा हे या टूलकीटविषयी बोलणारे पहिले नेते होते. त्यानंतर स्मृती इराणी, संतोष आणि संबित पात्रा यांनीही अशा प्रकारचे आरोप केले. त्यांनी काँग्रेसच्या संशोधन विभागाच्या लेटरहेडवर छापलेली कागदपत्रंही जाहीर केली होती.
तर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनेही रायपूरमध्ये छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग आणि संबित पात्रा यांच्या विरोधात खोटी आणि चुकीची माहिती दिल्यासंदर्भात एफआयआर दाखल केली आहे.

आणखी वाचा- Congress Toolkit : काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते? – देवेंद्र फडणवीस

दोन दिवसांपूर्वीच भाजपा नेते आणि मंत्र्यांनी काँग्रेसवर टूलकिटचे आरोप करणारे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले होते. टूलकिटबाबतची पत्रकं भाजपा नेत्यांनी शेअर केली आहेत. यात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘Indian Stain’ आणि ‘Modi Strain’ असे शब्द वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबत कुंभ मेळ्यातून करोनाचा प्रसार झाल्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचा आरोपही भाजपा नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी रोज करत असलेलं ट्वीटही टूलकिटचा भाग असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. जाणीवपूर्वक कुंभमेळ्यावर कमेंट्स केली गेली आहे. मात्र ईदवर गप्प असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

हेही वाचा- “खोटं बोलण्यात वेळ घालवू नका, लोकांचे जीव वाचवा”; टूलकिटवरुन प्रियांका गांधीची टीका

दरम्यान, काँग्रेसनं भाजपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. तसेच याप्रकरणी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.