कोईम्बतूरमधील एका व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीत गुरुवारी चौघांचा बळी गेला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. इमारतीमध्ये असलेल्या एका खासगी बॅंकेच्या शाखेला सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने इतरत्र पसरली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोईम्बतूर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दहा बंब आणि लष्कराचे दोन बंब यांच्या साह्याने जवानांनी सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱयांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. करुणागारन यांनी दिली. आग लागल्यामुळे घाबरून इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे दोन महिला जखमी झाल्या आहेत.