श्रीनगर : कुपवाडा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे पाच जवान शहीद झाले तर  घटनास्थळावर झालेल्या धुमश्चक्रीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला.

शहीद झालेल्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) एक निरीक्षक आणि जवान, त्याचबरोबर लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कुपवाडातील बाबगुंद परिसरातीस एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी लपून बसलेल्या घराच्या दिशेने सुरक्षा कर्मचारी जात असताना झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले.

चकमकीच्या ठिकाणी युवकांचा एक गट आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षांत एका नागरिकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानी लष्कर युद्धबंदीचा भंग करून सीमेवर जोरदार गोळीबार आणि तोफांचा मारा करीत आहे. त्यात काही नागरिक जखमी झाल्याचे, तर अनेक ग्रामस्थांनी स्थलांतर केल्याचे वृत्त आहे.