केरळमधील परियारम या ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी बसशी दुसऱ्या बससोबत टक्कर झाली आणि हा अपघात झाला. एक खासगी बस टायर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याचवेळी दुसरी बस आली आणि या बसला धडक दिली ज्या घटनेत ५ जणांचा मृत्यू आणि १० जण जखमी झाले आहेत. पिलाठरा जवळ ही घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जखमी झालेल्या प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. पिलाठरा भागात संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यामुळे रस्ते निसरडे झाले होते. याच कारणामुळे चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले असावे आणि तो चालवत असलेली बस उभ्या असलेल्या बसला धडकली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह परियारम रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत अशीही माहिती समोर आली आहे.