अरुणालचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले पाच तरूण चीनमध्ये सापडले असल्याची माहिती केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटद्वारे दिली आहे. चिनी ‘पीएलए’ या वृत्तास दुजोरा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

चिनी ‘पीएलए’ (पीपल्स लिबरेशन आर्मी)ने भारतीय सेनेकडून हॉटलाइनवर पाठवण्यात आलेल्या संदेशाला उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता तरूण त्यांच्या भागात आढळले आहेत. आता या तरूणांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. असे ट्विट किरेन रिजीजू यांनी केले आहे.

अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी मागील काही दिवसात दावा केला होती की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे कथितरित्या अपहरण केले आहे. एरिंग यांनी पीएमओला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये दावा केला होता की, अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांनी भारत सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी देखील केली होती.

यानंतर केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी देखील अरुणाचल प्रदेशच्या पाच रहिवाशांबद्दल चिंता व्यक्त करत म्हटले होते की, भारतीय सेनेने रविवारी चिनी सैन्याच्या पीएलएला संदेश पाठवला होता. खरेतर एकदिवस अगोदरच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा, त्यांनी या संबंधी त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे म्हटले होते.