नवी दिल्लीहून इटलीतील मिलानकडे जाणाऱ्या अलिटालियाच्या विमानात एका भारतीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याने पायलटला जबरदस्तीने विमान अबुधाबीत इमर्जन्सी लँडिग करण्यास भाग पाडण्यात आले.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कैलाशचंद्र सैनी (वय ५२, सध्या इटलीचे रहिवासी, मुळचे राजस्थानचे) हे आपला मुलगा हिरालाल याच्यासोबत नवी दिल्लीहून इटलीतील मिलान येथे विमानाने निघाले होते. दरम्यान, विमानातच त्यांचा अचानक मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली त्यामुळे विमानाचे अबुधाबीत इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.

दरम्यान, अबुधाबी सरकारने सैनी यांचे पार्थिव भारतात पाठवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्या मुलाला अबुधाबीच्या सरकारने मृत्यू प्रमाणपत्रही दिले आहे. नवी दिल्लीतून याप्रकरणी अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलासोबत सैनी यांचे पार्थिव इतिहाद एअरलाइन्सच्या विमानाने भारतात पाठवण्यात येणार आहे, युएईतील भारतीय उच्चायुक्त एम राजामुरुगन यांनी ही माहिती दिली.