पूर्व इंडोनेशियात जोरदार पावसाने पूर व भूस्खलनात ४४ जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत.  प्रतिकूल हवामान अडकलेल्यांचा शोध घेण्यात आडकाठी ठरत आहे.

लामेनेले खेडय़ात काही घरांवर  काल मध्यरात्री दरड कोसळली.  टेनगारा प्रांतात फ्लोरेस बेटांवर हा प्रकार झाला. मदतकार्य करणाऱ्यांना ३८ मृतदेह सापडले असून पाच जण जखमी अवस्थेत सापडले आहेत, असे स्थानिक आपत्ती निवारण संस्थेच्या प्रमुख लेनी ओला यांनी म्हटले आहे. ओयांग बायांग खेडय़ात ४० घरे उद्ध्वस्त झाली असून शेकडो  घरे पाण्याखाली गेली.  मोसमी पावसाने इंडोनेशियात मोठय़ा प्रमाणात भूस्खलन व पुराचे प्रकार घडत असतात. इंडोनेशिया हा १७ हजार बेटांचा समूह असून तेथे लाखो लोक डोंगराळ भागात राहतात. वाइबुराक या खेडय़ात तीन लोक मरण पावले असून सात जण बेपत्ता आहेत. रात्रभर पाऊस कोसळत होता, त्यामुळे नद्या व कालव्यांचे बांध फुटून पाणी ईस्ट फ्लोरेस जिल्ह्यात पसरले. चार जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेकडो लोक मदतकार्यात सहभागी होत आहेत. वीज पुरवठाही खंडित झाला असून रस्त्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.