केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे वकील राम जेठमलांनी यांचे मानधन सरकारी तिजोरीतून देण्याचा घाट दिल्ली सरकारने घातला आहे. यावरुन वाद सुरु असतानाच राम जेठमलानी यांनी मात्र केजरीवालांना दिलासा दिला आहे. केजरीवाल यांनी पैसे नाही दिले तरी मी फुकट खटला लढायला तयार असल्याचे राम जेठमलानी यांनी जाहीर केले आहे.

अरविंद केजरीवाल डीडीसीए प्रकरणात अरुण जेटलींवर गंभीर आरोप केले होते. यानंतर जेटली यांनी केजरीवाल यांच्यावर मानहानी प्रकरणी खटला दाखल केला आहे. या खटल्याचा ३ लाख ८६ कोटींचा कायदेशीर खर्च देण्यात यावा, यासाठी केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहिले आहे. ही रक्कम केजरीवाल यांचे वकील असलेल्या राम जेठमलानी यांना खटला लढवण्याची फी म्हणून देण्यात येणार आहे. केजरीवाल यांच्या वैयक्तिक खटल्याचा भार दिल्लीकरांनी का सोसावा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावरुन वाद सुरु असतानाच मंगळवारी राम जेठमलानी यांनी या वादावर भाष्य केले आहे. ‘मी फक्त श्रीमंताकडूनच फी घेतो. गरीबांसाठी मी फुकट काम करायला तयार असतो’ असे जेठमलानी म्हणालेत. न्यायालयात माझ्याकडून होणारी उलट तपासणी टाळण्यासाठी अरुण जेटली यांनी हा वाद निर्माण केला असा आरोप त्यांनी केला. दिल्ली सरकार किंवा केजरीवाल या दोघांकडूनही मला पैसे नाही मिळाले तरी मी हा खटला फुकट लढवणार आहे. केजरीवाल यांना गरीब समजून मी फी घेणार नाही असे त्यांनी सांगितले.

मानहानी खटल्यात अरविंद केजरीवाल यांच्या वतीने राम जेठमलानी १३ वेळा न्यायालयात उपस्थित होते. जेठमलानी यांनी यासाठी १ कोटी रुपये रिटेनर, तर प्रत्येक सुनावणीसाठी २२ लाखांची रक्कम घेतली. खटला सुरु झाला  त्यावेळी जेठमलानी केजरीवालांसाठी मोफत खटला लढवणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त फी आकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यात भर म्हणजे केजरीवाल यांनी थेट सरकारी तिजोरीतून हे पैसे देण्याचे प्रयत्न केल्याने विरोधकांना केजरीवाल यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली आहे.