कावड यात्रेत डीजे वाजवण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली आहे. मात्र, या डीजेंवर फिल्मी गाणी नव्हे तर केवळ भजनंच वाजवायची असा आदेशही त्यांनी दिला आहे. याकडे पोलिसांना कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

कावड यात्रेसाठी आयोजीत राज्य प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत त्यांनी या सुचना दिल्या आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले की, कावड यात्रेदरम्यान डीजेंवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र, त्यावर फिल्मी गाणी वाजवण्यास परवानगी नसेल, तर केवळ भजनंच वाजवता येईल.

कावड यात्रेसाठी देशभरातील शिवभक्त हे उत्तर प्रदेशातील हरिद्वार, गौमुख आणि उत्तराखंडमधील गंगोत्री येथे पायी चालत येतात. १६ जुलै रोजी या कावड यात्रेला सुरुवात होणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कावड यात्रेत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. यात्रेवर हेलिकॉप्टरमधूनच पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिव मंदिरांजवळ मांस आणि दारुची दुकाने दिसणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत.