बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली. यानंतर परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झालं. मात्र, यंदा प्रथमच बिहार कॅबिनेटमध्ये एकही मुस्लीम चेहरा नसल्याचं समोर आलं आहे. एवढच नाहीतर बिहारमधील सत्ताधारी एनडीएकडे मुस्लीम समाजाचा एकही आमदार नाही.
स्वातंत्र्यानंतर कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल,की बिहारमधील सत्ताधारी आघाडी विधानसभेतील सत्तेच्या खुर्च्यांवर मुस्लीम आमदाराविना बसली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त, हिंदुस्थान अवाम मोर्चा(सेक्युलर) व विकास इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तरी, यापैकी कोणत्याही एका पक्षाला मुस्लीम आमदाराला निवडून विधानसभेत पाठवता आलेले नाही. विशेष म्हणजे या राज्यात १६ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.
आणखी वाचा- लालू प्रसाद यादव यांचा नितीशकुमार व भाजपावर निशाणा, म्हणाले…
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूने ११ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. मात्र, ते सर्वजण निवडणूक हरले.
जेव्हा बिहारच्या कॅबिनेटने शपथ घेतली. तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एखादा मुस्लीम चेहरा कॅबिनेटमध्ये घेण्याची संधी होती व नंतर त्याला विधानपरिषदेवर घेता आले असते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॅबिनेटची बांधणी करताना समजातील सर्व वर्गांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करूनही तसे काहीच घडले नाही.
घटनात्मक तरतूदीनुसार बिहार कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३६ सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. म्हणजे नितीश कुमार यांना अद्यापही २१ सदस्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची संधी आहे. अशी शक्यता वर्तविली जात आहे की मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारामध्ये समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी मुस्लीम चेहऱ्याचा समावेश होताना दिसेल.
बिहार निवडणुकीत एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली आहे. तर विरोधी महाआघाडीस ११० जागांवर समाधान मानावं लागेलं आहे. राज्यात राजद ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्या खालोखाल भाजपा -७४ व जदयु ४३ जागा मिळवण्यात यशस्वी झाले. काँग्रेसच्या वाट्याला केवळ १९ जागा आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 3:13 pm