नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजिअमने उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ आणि सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकील इंदू मलहोत्रा यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्तावाद्वारे शिफारस केली आहे. केंद्र सरकारने जर या प्रस्तावाला मंजुरी दिली तर इंदू मलहोत्रा या सुप्रीम कोर्टाच्या थेट न्यायाधीशपदी नियुक्ती केलेल्या देशातील पहिल्या महिला वकील ठरतील.

कॉलेजिअममध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अन्य न्यायाधीशांसोबत या दोन नावांवर शिक्कोमोर्तब केले आहे. विशेष म्हणजे, न्यायमूर्ती एम. जोसेफ यांनी हायकोर्टात असताना २१ एप्रिल २०१६ रोजी उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांचे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे त्यांच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीला सरकारकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र, जर इंदू मलहोत्रा यांच्या नावाला मंजुरी मिळाली तर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आर. बानूमती यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला न्यायाधीश असतील. सध्या सुप्रीम कोर्टात ३१ पैकी २५ न्यायाधीश कार्यरत आहेत. अजूनही ६ न्यायाधीशांच्या जागा येथे रिक्त आहेत.