देशात गेल्या वर्षी करोनाने शिरकाव केल्यापासून पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखाचा टप्पा सोमवारी ओलांडला. गेल्या २४ तासांत देशात १,०३,५८८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. करोनाकाळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून, सोमवारी दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखाचा टप्पा पार करून नवा उच्चांक नोंदवला.

गेल्या २४ तासांत ४७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १,६५,१०१ वर पोहोचली. देशात सलग २६ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात येत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,४१,८३० वर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५.८९ टक्के आहे.

पाच हजार वैद्यकीय अधिकारी, १५ हजार परिचारिका लवकरच उपलब्ध

मुंबई : राज्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार परिचारिका तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या २० एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे करोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

पंतप्रधानांचा गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : देशातील करोनास्थिती आणि लसीकरण मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी १७ मार्चला पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून करोनास्थितीचा आढावा घेतला होता. पंतप्रधानांनी रविवारीही उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यात त्यांनी रुग्णवाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

राज्यात करोनाचे ४७,२८८ नवे रुग्ण

आठवडाअखेरच्या सुट्ट्यांमुळे सोमवारी तुलनेत कमी रुग्णनोंदीचा कल कायम आहे. राज्यात सोमवारी करोनाचे ४७,२८८ रुग्ण आढळले. राज्यात रविवारी ५७ हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली होती. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी रुग्णवाढ ठरली. त्यातुलनेत सोमवारी कमी रुग्ण आढळले असून, करोना निर्बंध लागू करण्यात आल्याने पुढील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्येचा कल महत्त्वाचा ठरणार आहे.