पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला परदेशी प्रसारमाध्यमांनी धाडसी निर्णय म्हणून प्रसिद्धी दिली असली तरी त्यांनी या निर्णयाच्या विपरीत परिणामांचा इशारा देत नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडेही लक्ष वेधले आहे. त्याचे काही नमुने..

  • द न्यूयॉर्क टाइम्स – केऑस अ‍ॅज मिलियन्स इन इंडिया क्राऊड बँक्स टू एक्स्चेंज करन्सी – नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांत कशी अस्वस्थता पसरली आहे, पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर लोकांच्या कशा लांब रांगा लागल्या आहेत, एटीएममधील पैसे संपल्याने नागरिकांचे कसे हाल होत आहेत, रांगांमध्ये काही नागरिकांमध्ये भांडणे कशी होत आहेत, याचे वर्णन या बातमीत केले आहे.
  • बीबीसी -हाऊ इंडियाज करन्सी बॅन इज हर्टिग द पुअर, इंडिया रुपीज : केऑस अ‍ॅट बँक्स आफ्टर ब्लॅक मनी बॅन – या बातम्यांमध्येही पैसे नसल्याने गोरगरिबांचे कसे हाल होत आहेत आणि देशात कसा गोंधळ उडालेला आहे याचे वर्णन केले आहे.
  • द गार्डियन – व्हाय द करप्ट रिच विल वेलकम मोदीज सर्जिकल स्ट्राइक ऑन करप्शन – या वार्तापत्रात जयंती घोष यांनी या निर्णयामुळे कर चुकवणाऱ्यांना त्रास न होता रोख रकमेवर अवलंबून असणाऱ्या सामान्य नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागेल हे सांगितले आहे.
  • हफिंग्टन पोस्ट -डिमोनेटायझेशन डेथ टोल रायझेस टू २५ अ‍ॅण्ड इट्स ओन्ली बिन सिक्स डेज – या बातमीत खासगी रुग्णालयांत नव्या नोटांअभावी उपचार नाकारल्याने लहान मुले मृत्युमुखी पडत आहेत आणि बँकांसमोरील रांगांमध्ये त्रास होऊन ज्येष्ठ नागरिक कोसळत आहेत, हा सारा त्रास मांडला आहे.
  • अल जझिरा – अँगर इंटेसिफाइज ओव्हर इंडियाज डिमोनेटायझेशन मूव्ह, इंडिया डिमोनेटायझेशन : केऑस अ‍ॅज एटीएम्स रन ड्राय – या बातम्यांमधून अल जझिराने नागरिकांच्या मनातील संताप आणि दैनंदिन जीवनातील गोंधळाचे वर्णन केले आहे.
  • द वॉशिंग्टन पोस्ट – पॅनिक, अँगर अ‍ॅण्ड स्क्रॅम्बल टू स्टॅश कॅश अमिड इंडियाज ब्लॅक मनी – या बातमीतही गोंधळ, नागरिकांची धावपळ आणि त्रासाचे वर्णन आहे. तसेच या निर्णयाने लोकांची सोने-चांदी खरेदीसाठी झुंबड उडाल्याने त्यांचे दर वाढल्याचे म्हटले आहे.
  • द इंडिपेंडंट – इंडियन्स स्क्रॅम्बल टू डिपॉझिट कॅश अ‍ॅज गव्हर्नमेंट व्हॉइड्स हाय-व्हॅल्यू बँक नोट्स इन ब्लॅक मनी क्रॅकडाऊन – या बातमीत बँकांसमोर लागलेल्या मोठय़ा रांगा आणि सुटे पैसे संपल्याने पेट्रोल पंपावर झालेली भांडणे यांचे वर्णन केले आहे.
  • फायनान्श्यिल टाइम्स – इंडिया कॅश क्रंच अपडेट : स्टील केऑटिक – या बातमीत परिस्थिती अद्याप गोंधळाचीच असल्याचे म्हटले आहे.
  • इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स – इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ टू टेक अ हिट ओव्हर डिमॉनेटायझेशन ड्राइव्ह : इंडिया रेटिंग्ज – ज्या क्षेत्रांत रोख रकमेच्या व्यवहारांना अधिक महत्त्व आहे अशा रिअल इस्टेट, सोने खरेदी व अन्य क्षेत्रांना मोठा फटका बसेल असे म्हटले आहे.
  • द डेली मेल – मोदी बोस्ट्स हिज ५६-इंच चेस्ट, बट व्हॉट काइंड ऑफ सन लेट्स हिज मदर गो थ्रू दॅट? पीएम्स ९६-इयर-ओल्ड मदर क्यूज अप टू चेंज नोट्स – या बातमीत ‘डेली मेल’ने मोदींनी ५६ इंची छाती थोपटल्याचे म्हटले आहे. मात्र आपल्या ९६ वर्षांच्या आईला रांगेत उभे राहून नोटा बदलायला भाग पाडणारा हा कसला मुलगा ? असेही म्हटले आहे.