पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलं आहे.

राहुल गांधींनी काय विचारलं होतं ?
राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत चीनची आपल्या विनाशस्त्र जवानांची हत्या करण्याची हिंमत कशी झाली ? तसंच आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? असे सवाल विचारले होते.

एस जयशंकर यांचं उत्तर –
“सीमारेषेवर तैनात असणाऱ्या सर्व तुकड्या नेहमी शस्त्र बाळगतात. खासकरुन जेव्हा पोस्ट सोडत असतात तेव्हा. १५ जून रोजीदेखील गलवान येथे तैनात जवानांनी तेच केलं होतं. पण १९९६ आणि २००५ च्या करारानुसार शस्त्रांचा वापर करु शकत नाही,” असं एस जयशंकर यांनी सांगितलं आहे.

राहुल गांधी यांनी शहीद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी पाठवलं? असा सवालही केला आहे. केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा १८ सेकंदांचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरला शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, “चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे. मला विचारायचं आहे की, शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण?”.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना भाजपा नेते संबित पात्रा यांनी उत्तर दिलं आहे. भाजपा नेते संबित पात्रा यांनी राहुल गांधींना काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कराराची आठवण करुन दिली आहे. १९९६ मध्ये झालेल्या करारांचा उल्लेख करताना संबित पात्रा यांनी म्हटलं आहे की, “जर तुम्ही शिकलेले नसाल, काही माहिती नसेल तर लॉकडाउनचा फायदा घेत घरात काही पुस्तकं वाचली पाहिजेत. सोबतच काँग्रेसच्या कार्यकाळात चीनसोबत झालेल्या करारांबद्दलही वाचलं पाहिजे”. या करारात दोन्ही बाजूंनी कोणतीही फायरिंग केला जाणार नाही, स्फोटकांचा वापर होणार नाही तसंच शस्त्र घेऊन सैनिकही नसतील यावर सहमती झाली होती.