अणु साहित्य पुरवठादार गटाचे सदस्यत्व भारताला मिळवून देण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे एनएसजी बैठकीसाठी दक्षिण कोरियातील सोलला रवाना झाले आहेत. भारताला सदस्यत्व मिळू नये यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. ४८ देशांची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून आता ती अंतिम टप्प्यात असताना जयशंकर तिकडे रवाना झाले आहेत. भारताला एनएसजी सदस्यत्व मिळावे यासाठी विविध देशांचे मन वळण्याच्या प्रयत्न ते करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अमनदीप सिंग गिल हे अगोदरच सोलमध्ये असून ते भारताची बाजू मांडत आहेत. चीनने भारत एनपीटी कराराचा स्वाक्षरीदार नसल्याने पुन्हा एकदा विरोध सुरूच ठेवला आहे. एका देशाने जरी भारताविरोधात मत दिले तरी हे सदस्यत्व भारताला मिळू शकणार नाही. काही प्रतिष्ठित देशांचा भारताला पाठिंबा असला तरी चीनचा मात्र विरोध आहे. त्याचबरोबर तुर्कस्थान, दक्षिण आफ्रिका, आर्यलड व न्यूझीलंड भारताच्या बाजूने नाहीत. भारताला जर एनपीटी करार स्वाक्षरीच्या अटीतून सूट मिळणार असेल तर पाकिस्तानलाही मिळाली पाहिजे असे चीनने म्हटले आहे. भारताने असे म्हटले आहे, की  एनएसजी सदस्यत्वासाठी एनपीटीवर स्वाक्षरी केलेली असणे आवश्यक नाही. फ्रान्सने अशा कुठल्याही करारावर स्वाक्षरी केली नसताना त्यांना सदस्यत्व देण्यात आले होते. अणुतंत्रज्ञान व्यापार व निर्यातीसाठी भारताला हे सदस्यत्व हवे आहे.अणुतंत्रज्ञानाचा जागतिक व्यापार एनएसजी ही संघटना नियंत्रित करीत असते. अणुकार्यक्रमातून २०३० पर्यंत ६३००० मेगावॉट ऊर्जा तयार करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. एनएसजी सदस्यत्व मिळाल्यास भारताची ऊर्जेची गरज भागवण्यास मदत होणार आहे.

शांघाय परिषदेत मोदी -क्षी जिनपिंग भेट होणार

बीजिंग- ताश्कंदमध्ये गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट होणार असून त्या वेळी मोदी हे जिनपिंग यांच्याकडे भारताच्या एनएसची सदस्यत्वाला चीनने पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्याची शक्यता आहे. योग्य वेळी आम्ही या बाबतची संबंधित माहिती देऊ, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी सांगितले. दोन्ही नेते एससीओ परिषदेच्या निमित्ताने भेटणार आहेत, असे चुनिंग म्हणाल्या. अण्वस्त्र पुरवठादार गटात सदस्यत्व मिळण्याचा भारत प्रयत्न करीत असून चीनने त्यामध्ये अडसर निर्माण केला आहे त्यामुळे चीनने भारताच्या या प्रयत्नाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी मोदी या भेटीच्या वेळी जिनपिंग यांच्याकडे करणार असल्याची शक्यता आहे. तथापि, भारताच्या प्रयत्नांमध्ये चीन अडसर निर्माण करीत असल्याच्या वृत्ताचे चुनिंग यांनी खंडन केले आहे. भारताचा एनएसचीमध्ये प्रवेश होण्याच्या मार्गत चीनचा अडसर आहे असे म्हणणे योग्य नाही, असे चुनिंग म्हणाल्या. चीनचा अडसर हा शब्दप्रयोग योग्य नाही, एनएसजीच्या कार्यक्रम पत्रिकेवर बिगर एनपीटी देशांच्या प्रवेशाचा मुद्दा आम्ही पाहिलेला नाही, त्यामुळे चीन अडसर निर्माण करीत असल्याचे म्हणणे योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या.