गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या  मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून काम करतील अशी माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे राज्यपालपद दिले जाईल अशी चर्चा दीर्घ काळापासून सुरु होती. मात्र आता त्यांची नियुक्ती मध्यप्रदेशच्या राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार होता तो आता कमी होणार आहे.

आनंदीबेन पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुका लढणार नाही असे स्पष्ट केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना यासंदर्भातले पत्र लिहूनच आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केले होते. माझ्या जागी कोणत्याही नव्या आणि तरूण चेहेऱ्याला संधी द्या असेही त्यांनी या पत्रात म्हटले होते. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा प्रचारासाठी आले होते तेव्हा त्यांच्यासोबत आनंदीबेन पटेलही प्रचारासाठी गेल्या होत्या. आनंदीबेन पटेल यांनी त्यांचा राजीनामा फेसबुकवर लिहिल्यानेही मोठी चर्चा रंगली होती.