घरातील नोकराशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याच्या प्रकरणात मध्य प्रदेशचे माजी अर्थमंत्री राघवजी यांना आज अखेर अटक करण्यात आली. राजकुमार डांगी या नोकराने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राघवजी यांचा याआधीच राजीनामा घेतला आहे. मध्य प्रदेशात या वर्षी उत्तरार्धात विधानसभा निवडणुका होत असून, त्या पाश्र्वभूमीवर भाजपने राघवजी यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही कसूर केलेली नाही.
भोपाळ परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक उपेंद्र जैन यांनी सांगितले, की राघवजी यांना ‘कोह ए फिजा’ या भोपाळमधील एका जुन्या वसाहतीत असलेल्या फ्लॅटमध्ये पकडण्यात आले. फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होते व राघवजी हे आतमध्ये होते.
पोलिसांना राघवजी यांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी या वसाहतीत जाऊन त्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला, पण कुणीच प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा राघवजी आतच होते. त्यांना अधिकृतपणे अटक केल्यानंतर हबीबगंज पोलिस स्टेशनला आणण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर राघवजी यांनी रविवारी त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा केला होता व नंतर विदिशा येथून गायब झाले होते. त्यांच्याविरोधात त्यांच्या नोकराने फिर्याद दाखल केली होती. त्यात असे म्हटले आहे, की सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने राघवजी यांनी आपला साडेतीन वर्षे लैंगिक छळ केला.