पाकिस्तानचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आमीर हानिफ यांचा मुलगा मोहम्मदने १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड न झाल्याने आत्महत्या केली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी ‘जिओ न्यूज’ने या संदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. मोहम्मदने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.

“संघनिवडीच्या प्रक्रियेदरम्यान तो खूप दबावाखाली होता. प्रशिक्षकांनी त्याला तुझं वय उलटून गेल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे प्रशिक्षकांच्या वागण्यामुळे त्याला अधिक निराशा आली आणि त्यातूनच माझ्या मुलाने आत्महत्या केली.” आमिर हनिफ यांनी प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमीर हनिफ यांनी पाकिस्तानकडून ५ वन-डे सामने खेळले होते. मोहम्मद याआधी कराचीच्या १९ वर्षाखालील संघाकडून लाहोर येथे झालेल्या स्थानिक स्पर्धेत खेळला होता. मात्र तिकडून दुखापतीचं कारण देत त्याला घरी पाठवण्यात आलं होतं. प्रशिक्षकांच्या या निर्णयाला मोहम्मदने सामन्यादरम्यान विरोध केला होता, मात्र तुझी संघात परत निवड केली जाईल या आश्वासनावर मोहम्मदला प्रशिक्षकांनी घरी पाठवलं. मात्र यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर मोहम्मदची संघात निवड झाली नाही. अंतिम क्षणाला, तुझं वय निघून गेलं आहे हे कारण देत प्रशिक्षकांनी मोहम्मदला संघातून वगळलं. प्रशिक्षकांच्या याच वागण्यामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचं हनिफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.