अमेरिका, अफगाणिस्तानची संयुक्त कारवाई

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या पुत्राची मंगळवारी तालिबान्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सैन्याने अफगाणिस्तानात संयुक्त कारवाई करून गिलानी यांच्या पुत्राची सुटका केली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून तीन वर्षांपूर्वी गिलानींच्या पुत्राचे अपहरण करण्यात आले होते.

गिलानी यांच्या पुत्राचे नाव अली हैदर गिलानी असे असून मंगळवारी अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सैन्याने संयुक्त कारवाई करून त्याची तालिबान्यांच्या तावडीतून सुटका केली, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद हनिफ आत्मर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ यांना दूरध्वनीवरून अली हैदर याची सुटका करण्यात आल्याचे वृत्त कळविले. आता अली हैदरची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला पाकिस्तानात पाठविण्यात येणार आहे.

क्वेट्टाजवळ पाकिस्तानच्या सैन्याने सलमान तासीर यांच्या पुत्राची सुटका केल्यानंतर दोन महिन्यांनी गिलानी यांच्या पुत्राची सुटका करण्यात यश मिळाले आहे.

अली हैदर याची सुटका झाल्याचे वृत्त पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी ट्विटरवरून दिले.

माजी पंतप्रधान गिलानी यांना अफगाणिस्तानच्या राजदूतांकडून दूरध्वनी आला, अली हैदरची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, असे बिलावल यांनी म्हटले आहे. अली हैदर अल-कायदाच्या ताब्यात होता. त्याची प्रकृती ठणठणीत असून विशेष विमानाने त्याला पाकिस्तानात पाठविण्यात येणार आहे.