मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे, हे भारताने सप्रमाण सिद्ध करूनही सातत्याने त्यास नकार देणाऱ्या आडमुठय़ा पाकिस्तानला त्याच्याच अधिकाऱ्याने घरचा अहेर दिला आहे. मुंबई हल्ल्याची आखणी आणि त्याचे सूत्रसंचालन पाकिस्तानातूनच झाल्याची कबुली या हल्ल्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेच्या माजी प्रमुखाने दिली आहे.
पाकिस्तानच्या केंद्रीय तपास यंत्रणेचे (एफआयए) माजी प्रमुख तारिक खोसा यांनी ‘डॉन’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात मुंबई हल्ल्याची आखणी व त्याचे सूत्रसंचालन कसे झाले, त्यात कोण सहभागी होते वगैरेची माहिती दिली आहे. अजमल कसाब हा पाकिस्तानीच होता, असेही त्यांनी या लेखात म्हटले आहे. मुंबई हल्ल्यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यावरही त्यांनी टीका केली आहे. हा खटला उगाच लांबवला जात असल्याचे खोसा म्हणतात. खटल्यातील साक्षीदारांनी जबानी फिरवणे, वकिलांवर प्राणघातक हल्ले होणे, त्यांना जीवे मारणे, न्यायमूर्तीची वारंवार बदली होणे इत्यादी कारणांमुळे हा खटला अधिकाधिक काळ प्रलंबित होत असल्याचे खोसा यांनी लेखात म्हटले आहे. पाकिस्तानी सरकारने आपल्या चुकांची कबुली देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतीय मच्छीमार ट्रॉलरचे अपहरण करण्यासाठी दहशतवाद्यांनी ट्रॉलरचा वापर केला आणि त्यानंतर तो पुन्हा बंदरात आणून त्याला रंगरंगोटी केली. तपास यंत्रणांनी तो ट्रॉलरही शोधला आहे, असेही खोसा यांनी लेखात म्हटले आहे.
मुंबईवरील हल्ला
नियोजित होता आणि तो पाकिस्तानातून करण्यात आला व त्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना सिंध प्रांतात प्रशिक्षण देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष हल्ला करताना कराचीतील एका नियंत्रण कक्षातून सूचना देण्यात येत होत्या.
– तारिक खोसा,  एफआयएचे माजी प्रमुख