माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे रविवारी निधन झाले. ती ४९ वर्षांची होती. झोपेतच तिची प्राणज्योत मालवली. जाना चेक रिपब्लिकची नागरिक होती. तिला दीर्घकाळापासून कर्करोगाने ग्रासले होते. तिने तिच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत १७ ग्रँड स्लॅम जिंकले. दुहेरी प्रकारात जानाच्या नावावर ७६ विजेतेपदे होती. तर एकेरी प्रकारात २४ विजेतेपदांवर जानाने नाव कोरले. १९८८ मध्ये तिला ऑलिम्पिकचे रौप्यपदक मिळाले. तर १९९६ मध्ये अटलांटा गेम्समध्ये तिने रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने जाना नोवोत्नाच्या निधनाच्या संदर्भातले वृत्त दिले आहे.

२००५ मध्ये तिने कोचिंग करायला सुरूवात केली. २०१३ मध्ये जाना निवृत्त झाली. १९९३ मध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेतील तिचा खेळ क्रीडा प्रेमींच्या स्मरणात राहिला आहे. स्टेफी ग्राफसोबत तिची लढत झाली होती. तिच्यासोबत खेळताना जाना नोवोत्नाने पहिल्या सेटमध्ये ६-७, ६-१, ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र स्टेफी ग्राफने दुसऱ्या सेटमध्ये चांगली कामगिरी करत तिला हरवले हेते. त्यावेळी ती डचेस ऑफ केंटच्या खांद्यावर डोके ठेवून रडली होती. त्याने तिला आधार देत तू पुढच्या वर्षी नक्की जिंकशील असा दिलासा दिला होता. टेनिसमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या जानाची कर्करोगासोबतची लढाईही सुरूच होती. रविवारी तिने अखेरचा श्वास घेतला.