राजकोट येथील ११ वर्षीय बलात्कार पीडितेनं गेल्या आठवड्यात मुलीला जन्म दिला आहे. या मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक असून तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला अहमदाबादच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मणका, मज्जारज्जू पूर्णपणे विकसीत होऊ शकले नाहीत त्यामुळे या चिमुकलीला अपंगत्त्व आलं असून जगण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. या चिमुकलीची प्रकृती नाजूक असल्यानं तिची वाचण्याची शक्यता धुसर झाली असून तिच्यावर योग्य ते उपचार करून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

तिच्यावर शस्त्रक्रिया करणं अवघड आहे. हे संपूर्ण प्रकरणच अधिक गुंतागुंतीचे आहे. फक्त मणक्यालाच नाहीतर मेंदूलाही गंभीर दुखापत झाली आहे. अशी माहिती बालरोगतज्ज्ञ विभागाचे डॉक्टर राकेश जोशी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. सोना रणजीत आणि सेजल परमार या दोन तरुण कॉन्स्टेबल सध्या तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. ही चिमुकली फक्त काही दिवस जगू शकते हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटलं तिच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत अशी भावना सोना आणि सेजलनं व्यक्त केली आहे.

काही महिन्यांपूर्वी राजकोटमध्ये ११ वर्षीय मुलीवर सहा जणांनी अनेकदा सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गेल्या आठवड्यात आणखी दोघांना ताब्यात घेतलं आहे.