विजय मल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी SBI ला सावध केले होते. बँकेने विजय मल्ल्याच्या विरोधात कोर्टात दाद मागावी असा सल्ला दवे यांनी बँकेला दिला होता. तो जर बँकेने ऐकला असता तर कदाचित विजय मल्ल्या देश सोडून जाऊ शकला नसता. स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जबुडव्या विजय मल्ल्याला थांबवण्याबाबतचा कोणताही कायदेशीर सल्ला घेतला नाही असेही दवे यांनी म्हटले आहे.

विजय मल्ल्याविरोधात सुप्रीम कोर्टात जावे असा सल्ला मी दिला होता. एसबीआयचे संचालक आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांना ही बाब ठाऊक होती मात्र त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही आणि कोणतीही हालचाल केली नाही. ज्यामुळे विजय मल्ल्या देश सोडून जाऊ शकला. याबाबत इंडियन एक्स्प्रेसन एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांना विचारले असता दुष्यंत दवे जे काही सांगत आहेत ते त्यांना सांगू दे आता मी SBI ची कर्मचारी नाही तुम्ही याबाबत सध्याच्या संचालकांना किंवा अध्यक्षांना भेटू शकता असे उत्तर दिले.

दरम्यान दुष्यंत दवे यांनी एवढेही सांगितले की, SBI चे कायदेविषयक सल्लागार आणि बँकेचे अधिकारी यांच्यासोबत जी बैठक झाली त्यात असा निर्णय घेण्यात आला होता की विजय मल्ल्याविरोधात सुप्रीम कोर्टात जायचे. ही बैठक रविवारी पार पडली त्यानंतर सोमवारी मी त्यांची सुप्रीम कोर्टात वाट बघत होतो मात्र कोणीही आले नाही. विजय मल्ल्या ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळाला आहे त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान विजय मल्ल्याने देश सोडून जाण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटलींना भेटलो होतो असे म्हटले. ज्यानंतर काँग्रेसने अरूण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर भाजपाकडून याप्रकरणी प्रत्यारोप होत आहेत. तसेच अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय मल्ल्या खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. आता या सगळ्या वातावरणात SBI ने विजय मल्ल्याविरोधात कोर्टात जाण्याचा सल्ला ऐकला नाही ही बाबही समोर आली आहे.