पंजाबमधील पठाणकोटमध्ये चौघांनी बंदुकीचा धाक दाखवत टॅक्सी पळवली आहे. बुधवारी सकाळी मधोपूर परिसरात ही घटना घडली आहे. चौघांनी जम्मू काश्मीर रेल्वे स्थानकाजवळ टॅक्सी भाड्याने घेतली होती. जम्मू काश्मीर ते मधोपूर असा प्रवास करायचा असल्याचं त्यांनी चालकाला सांगितलं होतं. मात्र पंजाबमध्ये प्रवेश करताच चौघांनी टॅक्सीसोबत पळ काढला. ‘चौघेही पंजाबीमध्ये बोलत होते. त्यांच्यातील एकाने रात्री जवळपास ११.३० वाजता उलटी येत असल्याचं सांगत टॅक्सी थांबवण्यास सांगितली’, अशी माहिती चालकाने दिली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. ‘आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही आहोत. पण हे दहशतवाद्यांनी केलं असावं असं वाटत नाही. हे चोरीचं प्रकरण वाटत आहे’, अशी माहिती पठाणकोटचे एसएसपी विवेकशील सोनी यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पठाणकोट आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २०१६ मध्ये पठाणकोटमधील हवाई दलाच्या अड्ड्यावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांनी हीच पद्धत अवलंबली होती. एअर बेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची कार चोरली होती.

पंजाब सीमारेषेवरील पोलीस महासंचालक परमार यांनी आपल्याकडे सर्वांचे फोटो असून लवकरच त्यांना अटक करु असा विश्वास व्यक्त केला आहे.