कॅनडाच्या पूर्व भागातील फ्रेडइरीटॉन शहरात गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये चार जण ठार झाले आहेत. अजूनही गोळीबार सुरु असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती फ्रेडइरीटॉन पोलिसांनी टि्वटरवरुन दिली आहे. या भागात गोळीबार सुरु असल्यामुळे नागरिकांनी मेन आणि रिंग रोडवरुन प्रवास टाळावा तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन कॅनडा पोलिसांनी केले आहे.

२०१४ मध्ये न्यू ब्रन्सविकमध्ये झालेल्या गोळीबारात रॉयल कॅनडीयन माऊंटेड पोलीस दलाच्या तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि दोन जण जखमी झाले होते. फ्रेडइरीटॉन शहरात सध्या सुरु असलेला गोळीबार ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अमेरिकेच्या तुलनेत इथे बंदुक बाळगण्यासंदर्भातील कायदे अत्यंत कठोर आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना सुद्धा इथे दुर्मिळ आहेत. पण अलीकडच्या काळात कॅनडामध्ये अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत.

मागच्या महिन्यात कॅनडातील टोरांटो शहरात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते तर १३ जण जखमी झाले होते.