उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेची धग अद्याप शमलेली नसताना, या ठिकाणी पुन्हा एक अतिशय संतापजनक व धक्कादायक अशी गुन्हेगारी घटना घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हाथरसमधील ही घटना गुरुवारी घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय ९ व १२ वर्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलिसात बलात्काराची घटना घडल्याची प्राथमिक नोंद केली गेली. पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेले दोन्ही मुलं एकाच गावातील आहेत. कायद्यातील तरतुदींनुसार गुन्ह्याची नोंद करून घेण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे.

या अगोदर हाथरसमध्ये दलित तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेमुळे सर्वचस्तरातून उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर टीका केली जात होती. दिवसेंदिवस उत्तर प्रदेशमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे येथील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.