फ्रान्समधील ट्रिबेस येथे सुपरमार्केटवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली असून रेडवान लेकदिम असे त्याचे नाव आहे. हल्ला करण्यापूर्वी २५ वर्षीय रेडवानने त्याच्या लहान बहिणीला शाळेत सोडले होते, अशी माहिती समोर आली आहे.

ट्रिबेस या गावातील सुपरमार्केटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या रेडवानला कंठस्नान घातले. रेडवान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे आता समोर आले आहे. २०१६ मध्ये अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी तो महिनाभरासाठी तुरुंगात होता. फ्रान्समधील गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रेडवानला अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती. तो वॉचलिस्टवर होता, मात्र कट्टरतावाद्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले नव्हते.

सुपर मार्केटवर हल्ला करण्यापूर्वी त्याने बहिणीला शाळेत सोडले होते, अशी माहिती समोर आली आहे. २५ वर्षीय रेडवानचा जन्म हा मोरक्कोत झाला होता. यानंतर त्याचे कुटुंबीय फ्रान्समध्ये आले होते. हल्ला करताना रेडवान ‘अल्ला हू अकबर’ असा नारा देत होता.  आयसिसच्या समर्थनार्थही त्याने घोषणा दिल्या. नोव्हेंबर २०१५ सालच्या पॅरिस हल्ल्यातील दहशतवादी सलाह अब्देसलामची सुटका करण्याची मागणी देखील तो करत होता, असे समजते. तो आयसिसच्या संपर्कात होता का, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, दुसरीकडे आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलीस आता या दाव्यात कितपत तथ्य आहेत, याचा तपास करत आहे.

सुपरमार्केटवर हल्ला करण्यापूर्वी रेडवानने कार्कसोन येथे एका कारचालकावर गोळीबार केला. त्याच कारने तो ट्रिबेसच्या दिशेने गेला. या दरम्यान त्याने एका पोलिसावरही गोळीबार केला. ट्रिबेसमध्ये त्याने सुपरमार्केटवर हल्ला केला. तिथे त्याने अनेकांना ओलीस ठेवले. शेवटी एका धाडसी पोलिसाने आत प्रवेश केला आणि हल्लेखोराचा खात्मा झाला.