करोना व्हायरस विरुद्धच्या या लढाईत विविध वैद्यकीय उपकरणांचीही गरज आहे. या उपकरणांच्या निर्मितीमध्ये भारतीय कंपन्याही मागे नाहीयत. करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई किट्स अत्यंत महत्वाचे आहेत. आधी या किट्सचे भारतात उत्पादन होत नव्हते. पण दोन महिन्यांच्या आत भारतीय कंपन्यांनी अशक्य वाटणारे हे लक्ष्य साध्य करुन दाखवले आहे. आता भारतातच दिवसाला २.०६ लाख किट्सची निर्मिती होत आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

दोन मे ला सर्वाधिक २.०६ लाख पीपीई किट्सचे उत्पादन करण्यात आले. पीपीई किट्सचे दिवसाला सरासरी उत्पादनाचे प्रमाण १.०५ लाख आहे. पीपीई किट्समध्ये मास्क, डोळयाचे सुरक्षा करणारी आय शिल्ड, बुटांचे शूज कव्हर, गाऊन आणि ग्लोव्हज यांचा समावेश होतो. COVID-19 च्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी हा किट परिधान करतात. करोनाची लागण होऊ नये यासाठी हा किट महत्वाचा आहे.

“देशांतर्गतच पीपीई किट्सचे उत्पादन वेगात चालू आहे. ही चांगली बाब आहे. दोन मे रोजी सर्वाधिक २.०६ लाख किट्सचे उत्पादन झाले. यापूर्वी देशांतर्गत उत्पादन होत नसल्यामुळे हे किट्स बाहेरुन आयात करावे लागत होते” असे आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. देशांतर्गत उत्पादन करणाऱ्या सरकारने अशा ११० कंपन्या शोधल्या आहेत. त्यातल्या ५२ कंपन्यांकडून उत्पादन सुरु आहे.