कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सुरु झालेली इंधन दरवाढ अद्यापही कायम आहे. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली. सध्या मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८४.९९ म्हणजे ८५ रुपये तर डिझेलचा ७२.७६ म्हणजे ७३ रुपये आहे. पेट्रोल-डिझेलच्या या वाढत्या किंमतीमुळे संपूर्ण देशात संताप वाढत चालला असून इंधनाच्या या वाढत्या दरांमुळे महागाई सुद्धा भडकू शकते.

या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये काही तोडगा निघू शकतो. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनावरील उत्पादनशुल्क कमी करण्याचे संकेत दिले होते. नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी नव्या फॉर्म्युल्यावर विचार सुरु असल्याचे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. यासंदर्भात पेट्रोलिअम मंत्री उद्या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. इंधनाच्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी आम्ही नव्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहोत असे त्यांनी सांगितले.

म्हणून वाढतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती

पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये विविध करांचा समावेश झाल्यामुळे आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतात.

पेट्रोलच्या किंमतीमध्ये करांचा वाटा ५० टक्के तर डिझेलच्या किंमतीमध्ये ४० टक्के करांचा वाटा असतो. पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कर, वॅट आणि डिलर्सचे कमिशन आकारले जाते. वॅटचा कर प्रत्येत राज्यानुसार बदलत जातो त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळया असतात.

भारतात पेट्रोल-डिझेल महाग असले तरी घरगुती वापराचा एलपीजी गॅस शेजारी देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल-डिझेलवर भारताइतका कर आकारला जात नसल्यामुळे तिथे पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे.