शहीद स्मारकाच्या भूमिपूजन सोहळयात एका भाजपा आमदाराने जोरदार गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. रमेश चंद्र मिश्रा असे या आमदाराचे नाव आहे. भूमिपूजन फलकावर नाव न दिसल्याने आमदार रमेश चंद्र मिश्रा प्रचंड संतप्त झाले. फलकावर आपले नाव नाहीय तसेच आपल्याला कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही, हे समजल्यानंतर रमेश चंद्र मिश्रा यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

आरडा-ओरड करत त्यांनी पूजेसाठी बसण्याची आसनं लाथेने उडवली. ते बदलापूरचे आमदार आहेत. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात हा विधानसभा मतदारसंघ येतो. बालुआ गावात ही घटना घडली. आमदार रमेश चंद्र मिश्रा गोंधळ घालत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रमेश चंद्र मिश्रा कार्यक्रमस्थळी येऊन, लोकांना दाटवणीच्या स्वरात इथे काय चालू आहे? अशी विचारणा करताना दिसतात.

शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वाराचा पायाभरणी कार्यक्रम असल्याचे स्थानिकांनी सांगितल्यानंतर मिश्रा संतप्त झाले. स्थानिक आमदार असूनही आपल्याला का बोलावले नाही? अशी त्यांनी विचारणा केली. एकूणच त्यांचा आवेश दाटवण्याचा होता. मतदारसंघात पायाभरणीचा कार्यक्रम होतो, तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधीचे नाव भूमिपूजन फलकावर असले पाहिजे असे मिश्रा म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे याची आपण तक्रार करणार, असे म्हणत मिश्रा तिथून निघून गेले.