उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या अजब कार्यक्षमतेचा नमुना पाहायला मिळाला. इतरवेळी सामान्य लोकांच्या किरकोळ चोरीच्या तक्रारीची दखलही न घेणाऱ्या पोलिसांनी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या तक्रारीवर मात्र आपल्या अजब कार्यक्षमतेची चुणूक दाखवली. लखनऊ महानगरपालिकेबरोबर दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा करार करण्यासाठी आलेले गेल इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक अनुप गुप्तांची बॅग मुख्यालयाच्या बाहेर गायब झाली. बदनामी होऊ नये म्हणून महापौरांपासून आयुक्तांपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना फोनाफोनी करुन बॅग शोधण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत हजरतगंज पोलिसांनी तीन बॅग शोधून आणल्या. विशेष म्हणजे यातील एकही बॅग गुप्ता यांची नव्हती.

भारतातील नवरत्न कंपनीत समावेश असलेल्या गेल इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक अनुप गुप्ता बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजता महानगरपालिका कार्यालयात आले. त्यांच्याबरोबर भाजपाचे अध्यक्ष मुकेश शर्मा आणि खासदार प्रतिनिधी दिवाकर त्रिपाठी हेही होते. महानगरपालिकेकडून मुख्य अभियंता एसपी सिंह यांनी एमओयूवर हस्ताक्षर केले. त्यानंतर ते आपल्या कारजवळ पोहोचताच बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात त्यांच्या परतीच्या तिकीटासह सुमारे ३५ हजार रुपये होते.

याची माहिती मिळताच महापौर आणि पालिका आयुक्तांनी हजरतगंज पोलिसांना बोलावले आणि सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांनंतर पोलीस तीन बॅग घेऊन महानगरपालिकेत आले. या सर्व बॅगांमध्ये कपडे होते. विशेष म्हणजे यातील एकही बॅग गुप्ता यांची नव्हती. पोलिसांनी कार चालकाला चोरीच्या संशयावरुन पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. एका खासगी एजन्सीच्या कारमध्ये गुप्ता हे पालिकेत आले होते, असे आयुक्तांनी सांगितले.