उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा जवळचा सहकारी अमर दुबे याला पोलिसांनी ठार केलं आहे. बुधवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेला ठार केलं. विशेष पथकाचे महानिरीक्षक अमिताभ यश यांनी ही माहिती दिली आहे. अमर दुबे एक फरार आरोपी होता.

विकास दुबेच्या टोळीकडून आठ पोलिसांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकऱणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली असून यामध्ये अमर दुबेचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं.

दरम्यान विकास दुबे पुन्हा एकदा पोलिसांच्या हातून निसटला आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी असणारा विकास दुबे हरियाणामधील फरिदाबाद येथील एका हॉटेलमध्ये पाहण्यात आलं. मंगळवारी पोलिसांनी फरिदाबाद येथील हॉटेलवर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. चौकशी केली असता पोलीस पोहोचण्याआधीच विकास दुबेने हॉटेलमधून पळ काढला असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून पाहिलं असता त्यामध्ये विकास दुबेसारखा दिसणारी व्यक्ती दिसत आहे.

दिल्ली पोलिसांनी हरियाणामधील फरिदाबाद आणि गुडगाव येथे हाय अलर्ट जारी केला आहे. दरम्यान विकास दुबे राजधानी दिल्लीत आत्मसमर्ण करेल असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.