गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला परशुराम वाघमोरे (वय २६) याच्या टूथब्रशवरील डीएनएचे नमुने हा न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १८ जणांविरोधात तब्बल ९ हजार २३५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरुतील राहत्या घरी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी परशुराम वाघमारे या आरोपीला कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली होती. गौरी लंकेश प्रकरणात परशुराम वाघमारेच्या टुथब्रशवरील नमुने महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलिसांनी या हत्याप्रकरणात हिंदू जनजागृती समितीशी संबंधित एच एल सुरेश या तरुणाला अटक केली होती. गौरी लंकेश प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचे काम सुरेशने केले होते. एसआयटीने सुरेशने लपवलेली बॅग जप्त केली होती. या बॅगेत टुथब्रश, कपडे आणि बोगस नंबर प्लेट होती. यातील टुथब्रशची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत टुथब्रशवरील डीएनएचे नमुने परशुरामच्या डीएनएशी जुळले आहे. याशिवाय पोलिसांनी जप्त केलेल्या ब्लँकेटवरील केसांच्या आधारे अमोल काळेच्या डीएनएची तपासणी केली. हा देखील एक महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

एच एल सुरेश हा बांधकाम कंत्राटदार असून गौरी लंकेश यांच्या हत्येपूर्वी सर्व आरोपींनी त्याचाच घरात आश्रय घेतला होता. हत्येनंतर सुरेशने बंदुकीसह सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी हे पुरावे गोळा करत फॉरेन्सिक तपासणीचा आधार घेत आरोपींविरोधातील खटला भक्कम केला आहे. या पुराव्यांवरुन परशुराम हा हत्येसाठी बेंगळुरुत आला होता हे स्पष्ट होते.

आरोपपत्रात पोलिसांनी आरोपी व सूत्रधारांच्या कॉल डेटा रिपोर्टही जोडला आहे. हत्येच्या सूत्रधारांनी मोबाईल फोन गावातील घरात ठेवले किंवा स्विच ऑफ करुन ठेवले होते. या प्रकरणाचे धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोचले तरी हत्येच्या दिवशी ते बेंगळुरुत नव्हतेच असे भासवता येईल आणि पोलिसांना आपल्याविरोधात पुरावा मिळू शकणार नाही, असा आरोपींचा प्रयत्व होता.