सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना, भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तान अजुनही काश्मीरचा राग आळवत आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने नुकतच काश्मीर प्रश्नावर, काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, #SaveKashmir अशा आशयाचं ट्विट केलं होतं.

शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटला भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “शाहिद आफ्रिदी आणि पाकिस्तान स्वतःच्या सैन्याबद्दल कितीही बोलत असले तरीही त्यांना अजुनही काश्मीरबद्दल याचना करावी लागत आहे. शाहिदी आफ्रिदीसारखी जोकर माणसं कितीह प्रयत्न करोत काश्मीर पाकिस्तानला कधीच मिळणार नाही, बांगलादेश आठवतंय का??” अशा शब्दांत गंभीरने आफ्रिदीला सुनावलं आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर शाहिद आफ्रिदीने याआधीही अनेक प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. भारतीय सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतरही आफ्रिदीने ट्विटरवर आगपाखड केली होती. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने या प्रश्नात मध्यस्थी करावी अशी मागणीही आफ्रिदीने यावेळी केली होती.