हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाची चौकशी अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आली असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली न्यायालयात सांगितल्याने उद्योगपती गौतम खेतान यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ नोव्हेंबपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याबाबत ३६०० कोटी रुपयांच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणावर दलाली देण्यात आल्याप्रकरणाची चौकशी अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असून अद्यापही पुरावे गोळा करण्यात येत आहेत, असे ईडीने न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर विशेष न्यायमूर्ती व्ही. के. गुप्ता यांनी खेतान यांच्या कोठडीची मुदत वाढविली.
या प्रकरणातील अन्य आरोपींचा जबाब नोंदविण्याचे काम ईडीच्या वतीने सुरू असल्याचे वकील विकास गर्ग यांनी न्यायालयास सांगितले. या प्रकरणी ईडीने संरक्षण मंत्रालय आणि अन्य संबंधितांकडे पत्र पाठवून काही माहिती मागविली असून त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. त्यामुळे खेतान यांच्या कोठडीस मुदतवाढ द्यावी, अशी विनंती करण्यात आली आणि न्यायालयाने ती मान्य केली.
त्यापूर्वी न्यायालयाने खेतान यांची जामिनासाठीची याचिका फेटाळली होती. अन्य आरोपींबाबतचा तपास अद्याप सुरू असल्याचे कारण न्यायालयाने दिले होते.