पाटणा : बिहारच्या बोधगया जिल्ह्यातील बौद्धांचे धार्मिक स्थळ असलेल्या महाबोधी विहार परिसरात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा हे बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून जवळच असलेल्या मठामध्ये थांबले आहेत. या ठिकाणी एक स्फोट झाल्यानंतर तपास मोहिमेदरम्यान स्थानिक पोलिसांना हा बॉम्ब आढळून आला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, महाबोधी विहारातील दलाई लामांच्या व्याख्यानानंतर ते जेव्हा बाजूच्याच मठात विश्रांतीसाठी गेले तेव्हा कालचक्र परिसरात एक छोटा स्फोट झाला होता. त्यानंतर तपासणीदरम्यान येथे दोन बॉम्ब आढळून आले आहेत.

महाबोधी विहार परिसरात २०१३ मध्ये साखळी स्फोट झाले होते. यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते. तब्बल १० बॉम्ब विहाराच्या परिसरात पेरण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालिन गृहमंत्रालयाने महाबोधी विहाराला केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआयएसएफ) सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय पुढे जाऊ शकला नाही. कारण विहाराच्या श्राइन बोर्डाने याचा खर्च उचलण्यास असमर्थता दर्शवली होती. तसेच स्वतःचेच खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा येथे बॉम्ब आढळून आल्याने चिंचेत वाढ झाली आहे.